नवी दिल्ली : वृत्तसंस्था । स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या नेतृत्वातील संघटनेने विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या शेअर्सच्या विक्रीतून ७९२.११ कोटी वसूल केले गेले आहेत, अशी माहिती अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिली आहे.
केंद्रीय संस्थेने ही मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत ही कारवाई केली आहे. ईडीने ही रक्कम बँकांच्या कन्सोर्टियमकडे दिली आहे.
यासह, मल्ल्या, मोदी आणि चोक्सी यांच्या मालमत्तांच्या विक्रीतून आतापर्यंत १३,१०९.१७ कोटींची वसूली झाली आहे, असे एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. बंद झालेल्या किंगफिशर एअरलाइन्सचे मालक विजय मल्ल्या यांच्यावर विविध बँकांचे ९,००० कोटी रुपयांचे कर्ज आहे. या व्यतिरिक्त पंजाब नॅशनल बँक कर्ज फसवणूक प्रकरणात प्रमुख आरोपी असलेले हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्यावर १३,००० कोटीचें नुकसान केल्याचा आरोप आहे.
पीएनबी विरुद्ध नीरव मोदी प्रकरणातील फरारी आर्थिक गुन्हेगार न्यायालयाने १,०६० कोटींच्या मालमत्ता जप्त करण्याची बँकांना परवानगी दिली आहे आणि ईडीने ३२९.६७ कोटी रुपये आर्थिक अपराधी कायद्याच्या तरतुदीखाली जप्त केले आहेत. १ जुलै २०२१ रोजी नीरव मोदीची बहीण असलेल्या पूर्वी मोदी यांनी त्यांच्या परदेशी बँक खात्यातून गुन्ह्याच्या रकमेतील १७.२५ कोटी ईडीकडे वर्ग केले.
काही दिवसांपूर्वी ईडीने ३,७२८.६४ कोटींची मालमत्ता एसबीआयच्या नेतृत्त्वात असलेल्या कन्सोर्टियमला दिली, ज्यात ३,६४४.७४ कोटींचे शेअर्स, .५४.३३ कोटींचा डिमांड ड्राफ्ट आणि २९.५७ कोटींच्या मालमत्तेचा समावेश आहे. मल्ल्या, नीरव मोदी आणि चोक्सी यांनी सार्वजनिक क्षेत्रातील विविध बँकांची (पीएसबी) फसवणूक केल्याचा आरोप केला होता. या माध्यमातून बँकांचे एकूण २२,५८५.८३ कोटी रुपयांचे नुकसान झाले.