मुंबई वृत्तसंस्था । भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला घेरण्यास सुरू केलेलं असतानाच आता त्यात काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यात उडी घेतली आहे. चीनच्या मुद्द्यावरून आम्ही भाजपला सवाल करणारच असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
प्रसारमाध्यमांसी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. चीनच्या मुद्द्यावरून आम्ही भाजपला सवाल का करू नये? आम्ही सवाल करणारच. विरोधी पक्षाचं ते कामच आहे, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. यापूर्वीही चव्हाण यांनी चीनबाबत केलेल्या विधानामुळे मोदी चीनमध्ये लोकप्रिय झाल्याचा चिमटाही त्यांनी काढला होता.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही चीनच्या मुद्द्यावरून आम्ही सतत प्रश्न विचारतच राहणार. आम्ही चीनच्या मुद्द्यावर केंद्र सरकारसोबत आहोत. पण जबाबदार विरोधी पक्ष म्हणून प्रश्न विचारणं हे आमचं कामच आहे, असं थोरात यांनी म्हटलं आहे.
चीनच्या प्रश्नावर काँग्रेस पक्ष सरकारसोबत आहे. मात्र त्याचा अर्थ राष्ट्रहिताचे मुद्दे मांडू नये, असा होत नाही, असंही त्यांनी सांगितलं. गेल्या ४५ वर्षांत चीन सीमेवर आपला एकही जवान शहीद झाला नव्हता. गलवान खोऱ्यात चीनच्या आगळीकीमुळे आपले २० जवान शहीद झाले आहेत. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सीमेत कोणीही घुसले नाही म्हणत आहेत. त्यांच्या या विधानाचा आधार घेऊन चीन आपल्या शहीदांना घुसखोर ठरवत आहे, असं ते म्हणाले. राहुल गांधी हे जनतेच्या मनातील प्रश्न सरकारला विचारत आहेत. राहुल गांधी यांची चिंता ही देशाच्या अखंडतेशी संबंधित आहे. ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधानांनी चीनच्या आगळीकीबद्दल चकार शब्दही काढला नाही, त्यामळे राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष प्रश्न विचारणारच, असेही त्यांनी स्पष्ट केले.