बीजिंग वृत्तसंस्था । गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. या संघर्षात भारतीय जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात चीनचे सैन्यही ठार झाले असल्याचे भारताने म्हटले होते. तर, चीनकडून सातत्याने भारताचा हा दावा फेटाळण्यात येत होता. अखेर ९४ दिवसानंतर चीनने त्यांचे सैन्य ठार झाले असल्याचे मान्य केले आहे. हे मान्य करताना चीनने मोठी चलाखी दाखवली आहे.
भारतीय जवानांनी चिनी सैन्याला दिलेले आक्रमक प्रत्युत्तर आणि लोकसभेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गलवान खोऱ्यातील संघर्षाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर चीनचा तिळपापड झाला आहे. चीन सरकारचे वृत्तपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाइम्स’चे संपादक हू झिजिन यांनी सांगितले की, गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान ठार झाले. मात्र, त्या तुलनेत चीनचे कमी सैनिक मृत्यूमुखी पडले असल्याची माहिती मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय चीनच्या सैनिकांनी काही भारतीय सैनिकांना ताब्यात घेतले होते. तर, भारताच्या ताब्यात एकही चिनी सैन्य नव्हता असेही त्यांनी म्हटले. गलवान खोऱ्यात भारतीय जवानांनीच चिनी सैन्यावर हल्ला केला असल्याचा आरोप त्यांनी केला.
गलवान खोऱ्यात चीनचे ४० हून अधिक जवान ठार झाले असल्याचा अंदाज भारत आणि अमेरिकन गुप्तचर संस्थांनी व्यक्त केला होता. तर, चीनने अधिकृत वक्तव्य करणे टाळले होते.
हू शिजिन यांनी गलवान खोऱ्यात चीनचे सैन्य ठार झाल्याचे असल्याचे सांगितले तरी नेमकी संख्या मात्र, लपवली. तर, दुसरीकडे पॅन्गाँगमध्ये चिनी सैन्याने भारतीय जवानांना उंच ठिकाणांवरून हटवले असून त्या ठिकाणांचा ताबा घेतला असल्याचा दावा केला आहे. पॅन्गाँगमध्ये चीनने वर्चस्व मिळवले असल्याचे त्यांनी म्हटले. भारताला सीमा प्रश्न युद्धाद्वारे सोडवायचा असेल तर नुकसान त्यांचे होणार आहे. चीनने आपली स्थिती मजबूत केली असल्याचा दावा त्यांनी केला. भारताने आता चर्चेद्वारे प्रश्न सोडवावा अशी मागणीही त्यांनी केली.
चीननं लडाखमध्ये जवळपास ३८ हजार स्क्वेअर किलोमीटर जमिनीवर अवैधरित्या ताबा मिळवल्याचाही पुनरुच्चार राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत केला. ‘सीमेवर निर्माण झालेल्या तणावामुळे द्विपक्षीय नात्यावरही परिणाम होणार, हे चीननं ध्यानात घ्यायला हवं’ असाही इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनला दिला. चीनच्या बाता आणि कृत्य यात फरक असल्याचंही राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत नमूद केलं. याचाच पुरावा म्हणजे चर्चा सुरू असतानाच चीनकडून २९-३० ऑगस्ट रोजी चिथावणीखोर कारवाई करण्यात आली.