नवी दिल्ली वृत्तसंस्था । राजनाथ सिंह यांनी संसदेत माहिती दिल्यानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधानांनी देशाची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करून प्रश्नही विचारले आहेत. “संरक्षणमंत्र्यांनी दिलेल्या माहितीवरून हे स्पष्ट झालंय की, मोदीजींनी चीनच्या घुसखोरीबद्दल देशाची दिशाभूल केली. आपला देश नेहमी लष्करासोबत उभा होता आणि राहिल. पण, मोदीजी, आपण केव्हा चीनविरोधात उभे राहणार आहात? चीनकडून आपल्या देशाची जमीन कधी परत घेणार? चीनचं नाव घ्यायला घाबरू नका,” असा उपरोधिक टोला राहुल गांधी यांनी मोदींना लगावला आहे
गेल्या काही महिन्यांपासून भारत-चीन सीमावादाचा मुद्दा देशात तापताना दिसत आहे. विरोधी पक्षांकडून सातत्यानं याबद्दल मोदी सरकारला प्रश्न विचारले जात आहेत. अखेर संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी माहिती दिली. चीननं लडाखमधील भारतीय जमीनीवर कब्जा केल्याचं सिंह यांनी सांगितलं. सिंह यांच्या माहितीचा हवाला देत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधत दोन प्रश्न उपस्थित केले आहेत.
“लडाखमधील भारताची ३८ हजार चौरस किलोमीटर जमीनीवर चीननं कब्जा केला आहे. त्याशिवाय १९६३ साली झालेल्या एका तथाकथित सीमा करारांतर्गत पाकिस्ताननं पाकव्याप्त काश्मीरमधील ५,१८० स्क्वेअर किलोमीटरचा भूभाग बेकायदरित्या चीनच्या ताब्यात दिला आहे,” अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेत दिली.
“सीमा प्रश्न एक जटिल मुद्दा आहे, हे भारत आणि चीन दोघांनी औपचारिकरित्या मान्य केले आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी संयमाची आवश्यकता आहे तसेच शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातूनच या मुद्याचे निष्पक्ष, परस्पर सहमतीने समाधान निघू शकते,” असं निवेदन राजनाथ सिंह यांनी संसदेत केलं.