चित्र वाघ ठाकरे सरकारवर भडकल्या

 

नाशिक: वृत्तसंस्था । भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या नवऱ्यावर दाखल झालेला गुन्हा हे त्यांना त्रास देण्याचे कारस्थान असल्याचे सांगत त्या ठाकरे सरकारवर भडकल्या आहेत

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल केल्याची बातमी समजली तेव्हापासून मला शरद पवार साहेबांची खूप आठवण येत आहे, असे वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले. मला आजही आठवते की, ५ जुलै २०१६ रोजी माझ्या पतीवर आरोप झाले. त्यानंतर ७ जुलैला ईदच्या दिवशी मी शरद पवार यांना भेटायला गेले. त्यावेळी शरद पवार यांनी माझ्याकडे एफआयआरची प्रत मागितली. ही प्रत नीट वाचल्यानंतर तुझा नवरा या सगळ्यात कुठेच नाही, असे शरद पवार यांनी मला सांगितले. त्यामुळेच आज सकाळपासून मला शरद पवार साहेबांची खूप आठवण येत आहे, असे चित्रा वाघ यांनी सांगितले.

चित्रा वाघ शनिवारी नाशिक येथील पत्रकारपरिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणावरून महाविकासआघाडी सरकारची अक्षरश: लक्तरे काढली. याप्रकरणात मी सातत्याने आवाज उठवत असल्यामुळेच माझे पती किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशी करायची होती तेव्हा एसीबीच्या अधिकाऱ्यांनी माझ्या पतीला घरी येऊन नोटीस दिली. पण आता त्यांच्यावर गुन्हा दाखल केला तर एसीबीला त्यांना कळवावेसे वाटले नाही का? एसीबीकडे माणसे उरली नाहीत का, असा संतप्त सवाल चित्रा वाघ यांनी विचारला.

ही लाच घेतल्याचे प्रकरण घडले तेव्हा माझे पती किशोर वाघ घटनास्थळापासून पाच किलोमीटरच्या परिसरातही नव्हते. याप्रकरणात मुख्य आरोपी असलेले तत्कालीन महानिरीक्षक गजानन भगत यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यांची अजून चौकशीच सुरु आहे. एसीबीच्या अनेक केसेस पेंडिंग आहेत. पण आता माझ्या नवऱ्यावरच गुन्हा दाखल कसा करण्यात आला, असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला.

एसीबीने ज्याप्रकारने तातडीने गुन्हा दाखल केला त्यासाठी मी गृहमंत्र्यांना तीनदा सॅल्यूट ठोकते. मी पूजा चव्हाण प्रकरणात आवाज उठवत असल्यामुळे माझ्या पतीला अटक करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्यावर रोज दबाव आणला जातोय, त्यांना टॉर्चर केले जात आहे. पण मला न्यायव्यस्थेवर विश्वास आहे, ती सरकारसारखी मुर्दाड नाही. मी या सरकारला एकटी पुरून उरेन. मी तुमच्यासोबत २० वर्षे काम केले आहे, हे विसरु नका, असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला.

नुकत्याच पुण्यात झालेल्या पत्रकारपरिषदेतही चित्रा वाघ यांनी शरद पवार यांच्याविषयी विश्वास व्यक्त केला होता. मी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या तालमीत तयार झाले आहे, हे सांगायला मला जराही संकोच वाटत नाही. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील संपूर्ण तपशील शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचला, तर ते संजय राठोडला पाठीशी घालणार नाहीत, हे मी विश्वासाने सांगते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतही मला हा विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले होते.

Protected Content