पुणे (वृत्तसंस्था) पुण्यात मागच्या काही तासांत कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील मृत्यू झालेल्यांची संख्या आतापर्यंत १३ वर पोहचली आहे.
महाराष्ट्रात मुंबईनंतर पुणे शहरात करोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. शहरातील नायडू रुग्णालयात -1, नोबेल रुग्णालयात – 1 आणि ससून रुग्णालयात 3 अशी एकूण 5 जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे. पुणे शहरात रोजच्या रोज नव्या रुग्णांची नोंद होत आहे. काल मध्यरात्रीनंतर ९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. नायडू, ससून व हडपसर येथील नोबेल रुग्णालयात बहुतांश करोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. त्यातील पाच जणांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यात ससून रुग्णालयातील तिघांचा समावेश आहे. मृतांमध्ये एक ५० वर्षीय महिला आहे. अन्य दोघे हडपसर आणि कोंढाव्यातील राहणारे होते. यापैकी एकाचे वय ५४ तर दुसऱ्याचे वय ७१ वर्षे होते. दरम्यान, शहरातील महर्षिनगर, कोंढव्यासह या लगतच्या पेठांमधील भागात सोमवारी सर्वाधिक रुग्ण आढळून आल्यामुळे हा भाग सील करण्यात आला आहे.