पुणे(वृत्तसंस्था) पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या पाचवर पोहोचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पुण्यात एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. तर या तिघांनी ज्या ओला टॅक्सीतून प्रवास केला होता, त्या टॅक्सीचालकालाही काेरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हा चालक मुंबई आणि पुण्यात ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आला होता, त्या सर्वांची तपासणी करण्यात येणार आहे. पुण्यात दुबईतून आलेल्या एका दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारीच उघड झाले होते. त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या यवतमाळमधील एका व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील लोकांची तपासणी करण्यात आली होती. या दाम्पत्याची मुलगी आणि त्यांनी मुंबई ते पुणे ज्या ओला कंपनीच्या टॅक्सीतून प्रवास केला होता, त्या टॅक्सीचालकाचीही तपासणी करण्यात आली होती. मंगळवारी या दोघांचे चाचणी अहवाल आले असता त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आल्यानंतर तातडीने नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, राज्यात ३०९ पैकी २८९ जणांचे अहवाल कोरोनासाठी निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.