भुसावळ प्रतिनिधी । येथे गाजलेल्या नट्टू चावरिया खून प्रकरणात माजी नगरसेवक संतोष बारसे यांच्यासह एकूण नऊ संशयितांची सबळ पुराव्याच्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
येथील पैलवान मोहन बारसे यांच्या खून प्रकरणी अटकेत असलेले नट्टू दयाराम चावरिया व गोपाळ शिंदे यांना धुळे जिल्हा कारागृहातून बसने (क्र.एमएच-१४-बी.टी.४०८३) भुसावळ न्यायालयात तारखेवर आणले जात होते. त्यावेळी नाहाटा चौफुलीजवळ गतिरोधक असल्याने बसची गती कमी झाल्यावर बसमधील अमित नारायण परिहार (रा. नागसेन कॉलनी, कंडारी, भुसावळ) याने त्याच्या गावठी पिस्तूलमधून गोळी झाडल्याने नट्टू चावरिया याचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात अमित परिहार, सागर मदन बारसे, संतोष मोहन बारसे, दीपक मोहन बारसे, जितेंद्र उर्फ पापा मोहन बारसे, मिथून मोहन बारसे, धीरज उर्फ भुर्या किशोर बारसे, हिरामण उर्फ हिरामण सकरू जाधव आणि पिद्या उर्फ आकाश शाम जाधव (सर्व रा. वाल्मीक नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होता.
या खटल्याचे कामकाज येथील अतिरीक्त जिल्हासत्र न्यायालयात सुरू होते. शुक्रवारी अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस.पी. डोरले यांनी सबळ पुराव्या अभावी या खटल्यातील माजी नगरसेवक संतोष बारसे यांच्यासह नऊ संशयितांची निर्दोष मुक्तता केली.