जळगाव जितेंद्र कोतवाल । चाळीसगाव हे गांजाचे हब झाले असून काल गुटख्याच्या गाडीच्या प्रकरणात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आहे. आज जळगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आ. चव्हाण यांनी बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेवर बोट ठेवले.
चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आज पहाटे चार वाजता सिनेस्टाईल पाठलाग करून गुटख्याने भरलेला ट्रक पकडला. हा ट्रक मेहुणबारे येथील पोलिसांनी पकडला असून तो तेथे कोणताही गुन्हा न नोंदविता जळगाव येथे नेला जात असल्याची माहिती मिळताच आ. मंगेश चव्हाण यांनी या ट्रकचा पाठलाग करून याला पकडले. याप्रसंगी जिल्हापेठ पोलीस व आ. चव्हाण यांच्यात चांगलीच शाब्दीक चकमक उडाली.
दरम्यान, या प्रकरणी आ. मंगेश चव्हाण यांनी दुपारी पत्रकार परिषद घेऊन पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, चाळीसगाव तालुका हा गांजाचा हब बनलेले आहे. तसेच येथे गुटख्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असून यात खूप आर्थिक उलाढाल होत आहे. या प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप आमदार चव्हाण यांनी केला. तर, काल रात्री आपण गुटख्याचा ट्रक पकडल्यानंतर पोलिसांनी आपल्या सारख्या जबाबदार लोकप्रतिनिधीला चांगली वागणूक दिली नसल्याचाही आरोप त्यांनी केला.
चाळीसगाव तालुक्यातील गुटखा, गांजा आदींसह अन्य अंमली पदार्थांच्या व्यापाराची पोलीस प्रशासनाने चौकशी करावी. तसेच कालच्या प्रकरणात खर्या आरोपींवर गुन्हा नोंदवावा. अन्यथा आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा देखील आमदार मंगेश चव्हाण यांनी याप्रसंगी दिला.
खालील व्हिडीओत पहा आमदार मंगेश चव्हाण नेमके काय म्हणालेत ते ?
https://www.facebook.com/watch/?v=409542263376694