चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी मार्केटिंग फेडरेशन व तालुका शेतकी संघातर्फे करगाव गणपती मंदिर परिसरातील शासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या नवीन गोदामात हमीभावाने मका व ज्वारी खरेदीची सुरुवात करण्यात आली आहे.
कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या हमीभावाने मका व ज्वारी खरेदी करण्यात यावी अशी मागणी चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष शशिकांत साळुंखे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पणन मंत्री बाळासाहेब पाटील, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ,यांच्या कडे मागणी करण्यात आली होती. आज अखेर मार्केटिंग फेडरेशन व तालुका शेतकी संघाच्या वतीने शासकीय हमीभावाने मका व ज्वारी खरेदीची सुरुवात करण्यात आली.
गेल्यावर्षी पावसाळा चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मका व ज्वारीची पेरणी केली होती, त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले होते मात्र कोरोनाच्या संकटामुळे बहुसंख्य अन्नप्रक्रिया उद्योग बंद पडल्याने शेतकऱ्यांना मका व ज्वारीची विक्री मातीमोल दराने करावी लागत होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, यांनी शेतकऱ्यांच्या मक्याला १७६० क्विंटल व ज्वारीला २५५० रु प्रति क्विंटल या जाहीर केलेल्या हमीभावाने शासनाने खरेदी करावी यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन च्या वतीने शेतकी संघामार्फत ऑनलाइन नोंदणी करण्यात आली होती.
त्यात चाळीसगाव तालुक्यातील जवळपास ७०० मका व ३०० ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे त्यात मका हेक्टरी ५४ क्विंटल व ज्वारी हेक्टरी १९.५० क्विंटल या मर्यादेत खरेदी करण्यात येत असल्याची माहिती शेतकी संघाचे अध्यक्ष शशिकांत साळुंखे यांनी दिली
ही योजनाच मुळात महाराष्ट्र शासनाची असल्यामुळे महाराष्ट्र शासनाचे आभार मानण्यात आले. चाळीसगाव तालुक्यातील नोंदणी केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मका व ज्वारीचा शेवटचा दाणा खरेदी झाला पाहिजे यादृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे, खरेदीसाठी आवश्यक असणारे बारदाने – पोते तहसीलदार यांनी तात्काळ उपलब्ध करून द्यावेत अश्या सूचना यावेळी दिल्या.
शेतकऱ्यांना आवाहन
३० जूनपर्यंत शेतकऱ्यांची नोंदणी व खरेदी प्रक्रिया सुरू राहणार असून शेतकऱ्यांनी आपला मका किंवा ज्वारी पिकपेरा असलेला सात बारा, आधार कार्ड व बँक पासबुक झेरॉक्स घेऊन शेतकी संघात नोंदणी करावी व महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या हमीभावाचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील यानिमित्ताने शशिकांत साळुंखे यांनी केले.