चाळीसगाव बाजार समिती सभापतीपदी कपिल पाटील तर साहेबराव राठोड उपसभापती

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी कपिल पाटील तर साहेबराव राठोड यांची आज उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

 

चाळीसगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागेसाठी नुकतीच निवडणुक प्रक्रिया हि राबविण्यात आली. या निवडणुकीत एकूण ४२ जण हे रिंगणात उतरले होते. यात प्रामुख्याने  आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील स्व. रामराव जीभाऊ स्मृती शेतकरी विकास पॅनल व माजी आमदार राजीव दादा देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनल यांच्यातील लढत ही खरी चुरशीची ठरली.

 

या संस्थेच्या निवडणुकीसाठी २८ एप्रिल रोजी शहरातील राष्ट्रीय कन्या विद्यालयात सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेच्या दरम्यान मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी उमेदवारांना मतदान केंद्रात जाण्यास बंदी असताना मध्ये गेल्याच्या कारणावरून दोन्ही गटात जोरदार राडा झाल्याचा यावेळी बघायला मिळाले. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करून सौम्य लाठीचार्ज केला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. व सुरळीत मतदान झाले.

 

यानंतर दुसर्‍या दिवशी लागलेल्या निकालात आमदार मंगेश चव्हाण यांच्या शेतकरी विकास पॅनलने १५ जागांवर वर्चस्व प्रस्थापित केले. यात सभापती व उपसभापतीपद नेमके कुणाला मिळणार याचा सस्पेन्स निर्माण झाला होता. या अनुषंगाने आज झालेल्या निवडीत सभापती आणि उपसभापतीपदी अनुक्रमे कपिल पाटील व साहेबराव राठोड यांची नियुक्ती करण्यात आली. निवड जाहीर होताच सभापती व उपसभापतींचे आमदार मंगेश चव्हाण यांनी अभिनंदन केले. तसेच बाजार समितीत पाच वर्षात पाच सदस्यांना सभापतीपदाची संधी मिळणार असल्याची माहिती देखील आमदार चव्हाण यांनी दिली.

Protected Content