चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काही तास उरले असतांना येथे पैशांचा मोठा महापूर आल्याची स्थिती दिसून येत असून एका फुलीसाठी रग्गड किंमत मोजण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत यंदा सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार टक्कर होत आहे. यात महायुतीच्या पॅनलची धुरा ही आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे असून महाविकास आघाडीच्या पॅनलचे नेतृत्व हे माजी आमदार राजीवदादा देशमुख हे करत आहेत. अर्थात आजी-माजी आमदारांसाठी ही लढाई प्रतिष्ठेची ठरलेली आहे. यात पहिल्यापासून दोन्ही पॅनलने वैयक्तीक गाठीभेटींसह मेळाव्यांच्या माध्यमातून प्रचारतंत्र राबविले. दोन्ही बाजूंनी मेळाव्यांमधून तसेच समाजमाध्यमातून आरोप-प्रत्यारोप देखील करण्यात आलेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक काळातील कामांवर महाविकास आघाडीने लक्ष केंद्रीत केले. तर महायुतीच्या पॅनलने केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून निधी आणण्याचे अभिवचन मतदारांना दिले. गेल्या काही दिवसांपासून या प्रचारतंत्राच्या जोडीला पैसे वाटपाची जोड मिळणार असल्याचे संकेत मिळाले होते. आणि शेवटच्या टप्प्यात ही बाब प्रत्यक्षात साकारत असल्याचे दिसून आले आहे.
चाळीसगाव तालुक्यात अलीकडच्या काळात झालेली राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक खूप गाजली होती. यात एका मतासाठी २० हजारांपेक्षा जास्त रूपये मोजण्यात आल्याची चर्चा रंगली होती. तर काही बहाद्दरांनी दोन्ही बाजूंचा पाहुणचार देखील घेतल्याचे दिसून आले होते. आता कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील शेवटच्या टप्यात ‘फुलीचा खेळ’ रंगात आला आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीपेक्षा किती तरी जास्त रूपये हे प्रति-मतासाठी वाटण्यात येत आहेत. हा सर्व प्रकार ‘तेरी भी चूप. . .मेरी भी चूप’ अशा प्रकारात होत आहे.
बहुतांश मतदारांपर्यंत उमेदवार हे आधीच पोहचलेले होते. तर काल रात्रीपासून ‘फुलीचा खेळ’ सुरू झाला आहे. यात मोठ्या प्रमाणात पैसे वाटप करण्यात येत असल्याची चर्चा आता रंगली आहे. यातून या निवडणुकीत कोण बाजी मारणार ? हे लवकरच समोर येणार आहे. मात्र तूर्तास बहुतांश मतदारांचे बल्ले-बल्ले होणार हे देखील तितकेच खरे !