चाळीसगाव प्रतिनिधी । येथील नगरपरिषदेच्या येत्या वर्षभरासाठी विविध विषय समिती सभापती निवड प्रक्रिया बिनविरोध झाली असून सर्व सभापती पदी सत्ताधारी नगरसेवकांची बिनविरोध निवड करण्यात आली.
बिनविरोध निवड
विविध समित्यांच्या सभापतीपदांसाठी निवड प्रक्रिया सकाळी दहा वाजता सुरू झाली. बारा वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र भरण्याची वेळ देण्यात आली होती.या दरम्यान सत्ताधारीच्या वतीने गटनेते संजय पाटील व भाजप शहराध्यक्ष नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, नितीन पाटील यांनी सर्व समित्यांसाठी आपली पाचही उमेदवारांची नामांकन पत्र दाखल केली. तर १२ वाजेनंतर विरोधी पक्षाचे नगरसेवक रामचंद्र जाधव, दिपक पाटील, बंटी ठाकुर, शेखर देशमुख, वंदना चौधरी, योगिनी ब्रह्मणकर, रंजना सोनवणे, आण्णासाहेब कोळी या सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते मात्र ते वेळेत पोहचू शकले नाही. म्हणून त्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले नाहीत. परिणामी विविध विषय सभापती पदी निवड बिनविरोध झाली. यात बांधकाम समिती सभापती अरुण बापू आहिरे, शिक्षण समिती सभापती संजय रतनसिंग पाटील, स्वच्छता वैद्यकीय आरोग्य समिती सभापती वैशाली सोमसींग राजपुत, जलनिःसारण व पाणीपुरवठा समिती सभापती चिरागोद्दिन शेख, महिला व बालकल्याण समिती सभापती विजया प्रकाश पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सत्ताधार्यांना बळ
आज निवड झालेले सर्वच ४ सदस्य भाजप व शिवसेनेच्या नगरसेविका विजया पवार यांना सभापती होण्याचा बहुमान मिळाला. यामुळे पालिकेतील सत्ताधारी पक्षाचे सर्वच जण निवडणून आले आहेत. यामुळे लोकनियुक्त नगराध्यक्षा आशालता चव्हाण, उपनगराध्यक्ष आशाबाई चव्हाण, यांच्यासह सर्व पदे युतीकडे आल्याने सत्ताधार्यांना बळ मिळाले आहे.
सभापतींची मिरवणूक
दरम्यान, निवड झालेल्या सभापतींची मिरवणूक काढण्यात आली. आमदार उन्मेष पाटील यांच्या कार्यालयात पोहचली तेथे आमदार उन्मेष पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले. आगामी कालखंडात नगरपालिकेच्या माध्यमातून विकासकामांना गती देण्यात येणार असल्याची ग्वाही आमदार पाटील यांनी याप्रसंगी दिली.