चाळीसगाव प्रतिनिधी । मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला चाळीसगाव शहरातील समता सैनिक दलाने जाहीर पाठींबा दिला आहे. याबाबत संघातर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवांनी त्यांच्या विकासासाठी शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी आरक्षणाची जी मागणी केलेली आहे. त्या मागणीस समता सैनिक दलाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे. आरक्षण देत असताना ओबीसी समाजाला जे प्रचलित 19 टक्के आरक्षण दिले गेले आहे .त्यास कसला ही धक्का न लागता कामा नये. ओबीसी समाजाला 346 जातींसाठी 19 टक्के आरक्षण देवून त्यांच्यावर देखील अन्यायच झालेला आहे. म्हणून मराठा समाजाला कोणतीही अट न घालता त्यांच्या संख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे. तोच नियम ओबीसी समाजासाठी देखील लावून त्यांचे देखील आरक्षणाची टक्केवारी वाढविण्यात यावी. यावर अंमल बजावणी न झाल्यास मराठा व ओबीसी समाजाच्या या मागणी साठी समता सैनिक दल देखील त्यांच्या होणाऱ्या आंदोलनात सहभागी राहील असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर संघाचे तालुकाध्यक्ष धर्मभूषण बागुल, विजय निकम, भाईदास गोलाईत, स्वप्नील जाधव, विष्णु जाधव, सचिन गांगुर्डे, बाबाझ पगारे, दीपक बागुल, जीवन जाधव, सचिन मोरे, प्रकाश बागुल व विशाल पगारे या पदाधिकाऱ्यांच्या यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.