चाळीसगाव प्रतिनिधी | शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारले जावे म्हणून गेल्या काही दशकांपासून विविध सामाजिक संस्थांनी संघर्ष केला आहे. मात्र प्रदिर्घ काळानंतर यश आल्याने ढोल ताश्याच्या गजरासह जल्लोषात अश्वारूढ पुतळ्याचे शहरातील शिवाजी महाराज चौकात रविवार रोजी स्थपना करण्यात आली.
चाळीसगाव शहरात संपूर्ण जगाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मारक उभारण्यात यावा म्हणून विविध सामाजिक संघटनांकडून गेल्या काही वर्षांपासून संघर्ष सुरू होता. दरम्यान, तत्कालीन आमदार व विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या अथक परिश्रमाला यश आले आहे. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अश्वारूढ पुतळ्याचे स्थापना शहरातील शिवाजी महाराज चौकात रविवार रोजी सायंकाळी करण्यात आली. तत्पूर्वी नाशिक येथील गर्गे आर्ट गॅलरीत स्मारक तयार केले आहेत. शिल्पकार श्रेयस गर्गे यांनी पुतळा तयार केले आहे. यासाठी त्याला एका वर्षाचा कालावधी एवढा लागला. सदर पुतळ्याची लांबी हि २१ फुटांची आहे. त्यासाठी एकूण ५८ लाख ५० हजार एवढा खर्च आला आहे. ६० लाख ३४ हजारांचा निधी मंजूर झाल्याने त्यातून हे काम पूर्ण करण्यात आले आहे. रविवार,२६ सप्टेंबर रोजी सकाळी ८:३० वाजता नाशिक मार्गे चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे आगमन झाले. त्यानंतर टाकळी, आडगाव, देवळी, बिलाखेड आदी ठिकाणांहून चाळीसगाव शहरात पुतळ्याचे आगमन सायंकाळी ७ वाजता जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्याचवेळी शहरातील सर्व रस्ते हे भगवेमय करण्यात आले होते. तर चबुतरा व इतर ठिकाणी सजावट करण्याचे काम शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा मंगेश चव्हाण यांनी केले. याप्रसंगी शिवकालीन दृश्य, जिवंत देखावे, घरावर भगवे झेंडे मोठ्या प्रमाणात दिसून आले. इतिहासात नोंदविला जाईल असा अविस्मरणीय क्षण चाळीसगावकरांनी अनुभवला. शिवरायांच्या आगमनाने प्रत्येकाच्या घराघरात दिवाळी सणाचा उत्सव साजरा होताना दिसून आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय , जय भवानी जय शिवाजी अशा विविध घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. याप्रसंगी खासदार उन्मेष पाटील, विद्यमान आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार राजीव देशमुख, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, नपा. अध्यक्षा आशालता चव्हाण, नगरसेवक, जि.प. सदस्य, पं.स व मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.