चाळीसगाव (प्रतिनिधी)। बहुसंख्य शेतकऱ्यांजवळ पेरणी हंगामाच्यावेळी आर्थिक चणचण दिसून येते. एवढेच नव्हे तर वेळेवर पैशांची उपलब्धता न झाल्याने वेळेवर पेरणीच होत नाही, त्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. बी-बियाणे खतांसाठी अनेकांना जवळची पाळीव जनावरे विकावी लागतात. अनेकांना दागिने गहाण ठेवून तर उसनवारी तसेच सावकाराचा दरवाजा ठोठावा लागतो. ही शेतकऱ्यांची अडचण दूर व्हावी यासाठी केंद्र सरकारने चार महिन्यांच्या अंतराने दोन-दोन हजार याप्रमाणे सहा हजार रुपयांची मदत देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अमलात आणली आहे. हा निधी तालुक्यातील ३७ हजार शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा आधार ठरणार असल्याची भावना आ. उन्मेष पाटील यांनी आज येथे व्यक्त केली. चाळीसगाव तहसील व तालुका कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने तहसिलदार कार्यालयाजवळ असलेल्या सभागृहात आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ आज सकाळी ११ वाजता करण्यात आला.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
यावेळी प्रांताधिकारी शरद पवार, जिल्हा परिषदेचे सभापती पोपट भोळे, तालुका कृषी अधिकारी सी.डी.साठे, पंचायत समितीचे उपसभापती संजय पाटील, सदस्य भाऊसाहेब पाटील, सुभाष पाटील भामरेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रांताधिकारी शरद पवार यांनी या योजनेबाबत माहिती दिली. याप्रसंगी लिलाबाई शिवाजी दौंड, हेमंत विजय फटांगरे, धर्मा लहू जाधव, देवेंद्र हिरालाल देवरे (सर्व रा.शिंदी), रत्नाबाई चंद्रभान पाटील (कोदगाव), हेमराज धनराज पाटील व संतोष रामचंद्र पाटील (रा. टेकवाडे खुर्द) या आठ लाभार्थ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन नायब तहसीलदार नानासाहेब आगळे केले तर आभार तालुका कृषी अधिकारी सी.डी.साठे यांनी मानले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी एस.आर. चव्हाण, पर्यवेक्षक डी.एस.पाटील, अविनाश चंदेले, कृषी सहाय्यक तसेच मंडल अधिकारी व सर्व तलाठी ग्रामसेवक तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.