चाळीसगावकरांना दिलासा : ‘त्या’ संशयितांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील एका खासगी रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर पॉझिटीव्ह झालेल्या रूग्णांच्या संपर्कातील संशयितांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने शहरासह तालुक्याला दिलासा मिळाला आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचार घेणार्‍या रूग्णाची नाशिक येथे पुढील उपचारावेळी चाचणी घेतांना त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. यामुळे त्या रूग्णावर उपचार करणारे डॉक्टर आणि त्यांचा स्टॉफ तसेच त्याच्या संपर्कातील अन्य अशा एकोणीस संशयितांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते. या सर्वांच्या स्वॅबचे सँपल घेऊन ते धुळे येथे पाठविण्यात आले होते. आज या सर्वांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने शहरवासियांनी सुटकेचा श्‍वास सोडला आहे.

चाळीसगावच्या चारही बाजूंनी कोरोनाग्रस्त तालुके असतांना शहरासह तालुक्यात करण्यात आलेल्या उपाययोजांमुळे आतापर्यंत तरी सुदैवाने एकही कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला नाही. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात ठिकठिकाणी फवारणी करण्यात आली असून कडकडीत लॉकडाऊनसाठी त्यांनीच पुढाकार घेतला. याला इतर पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. परिणामी आजवरचे सर्व जनता कर्फ्यू यशस्वी झाले आहेत. तर प्रशासकीय पातळीवरही आरोग्य खाते, नगरपालिका, महसूल आणि पोलीस प्रशासनाचे अतिशय उत्तम सहकार्य केल्याने तालुका आजवर कोरोनामुक्त राहिला आहे. यात आरोग्य अधिकारी तथा नोडल अधिकारी डॉ. बाविस्कर यांनी केलेले मोलाचे प्रयत्न देखील फलदायी ठरल्याचे दिसून येत आहे.

Protected Content