नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | युजीसीने आज जाहीर केलेल्या नवीन नियमानुसार आता चार वर्षांच्या पदवीनंतर कुणालाही थेट पीएच.डी. करता येणार आहे.
यूजीसीकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून पीएचडी प्रवेशासाठी असलेले पात्रता निकष बदलण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार आता पदवीनंतर थेट पीएचडीसाठी प्रवेश घेता येणार आहे. त्यासाठी आता पदव्युत्तर पदवीची अट आवश्यकता राहणार नाही. मात्र, यासाठीही युजीसीकडून काही अटी घालण्यात आल्या आहेत. चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना किमान ७५ टक्के गुण किंवा समतुल्य सीजीपीए असल्यास थेट पीएचडीसाठी प्रवेश घेता येणार आहे. याआधी पीएच.डी. साठी पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य होते. ही अट आता रद्द होणार आहे.
यूजीसी बर्याच काळापासून पदवीपूर्व कार्यक्रम पूर्ण करण्याचे मानक आणि पद्धत बदलण्याची तयारी करत होते. त्यासाठी नवा अभ्यासक्रम राबविण्याचा त्यांचा विचार होता. अखेर यामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहे. आज या संदर्भातील नियम जाहीर करण्यात आले असून यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.