मुंबई प्रतिनिधी | चंद्रकांत पाटलांनी पुराव्यांसोबत बोलावे, उगाच हवेत गोळीबार करू नये, खरं तर त्यांना अफवा पसरवण्याची सवय असल्याची टीका आज शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कानाखाली मारली तरी आम्ही सत्ता सोडणार नाही, असं ठाकरे सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्याने मला सांगितलं होतं, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यावरून खासदार संजय राऊत यांनी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.
या संदर्भात संजय राऊत म्हणाले की, एक मंत्री कोण? असा हवेत गोळीबार करून चालणार नाही. आणि कोणी कुणाच्या थोबाडीत मारत नाहीत. चंद्रकांत पाटील किंवा अन्य कुणी अशा अफवा पसरवित असतात. त्यांना आनंद मिळतो. त्यांनी त्याचा आनंद घ्यावा. पण महाविकास आघाडीचं सरकार तीन वर्षे चालेल. त्यानंतर महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल. त्याबाबत त्यांनी निश्चित राहावं, असा टोला पाटील यांनी लगावला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यामध्ये राष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा आपोआप देशाचा नेता होत असतो, असं त्यांनी सांगितलं. तसेच शेतकर्यांच्या आंदोलनाला संपूर्ण देशातून पाठिंबा मिळणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले. तर, आम्ही गोव्यात २० ते २१ जागा लढवणार आहोत. तसेच उत्तर प्रदेशातही आम्ही ८० ते १०० जागा लढवू, असं सांगतानाच गोव्यात महाविकास आघाडी सारखा प्रयोग करू शकतो. गोव्याच्या आघाडीत योग्य स्थान मिळालं तर आम्ही आघाडीत जाऊ शकतो. उत्तर प्रदेशातही काही शेतकरी संघटना आहेत. या संघटना आमच्या सोबत यायला तयार आहेत. खासकरून पश्चिमी उत्तर प्रदेशमधील शेतकरी संघटनांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातही आघाडीचा प्रयोग होऊ शकतो, असं राऊत यांनी सांगितलं.