भुसावळ, प्रतिनिधी । लॉकडाऊन कालावधीतील महाराष्ट्रातील गरीब जनतेचे तीन महिन्यांचे घरघुती विजबील पुर्णपणे माफ करावे अशी मागणी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांनी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.
कोरोना सारख्या जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी आणि हे संकट हद्दपार करण्यासाठी देशासह राज्यात लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने लॉक डाऊनच्या परिस्थितीत जनतेला दिलासा देणारे व जनतेच्या हिताचे महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. ऊर्जा खात्याअंतर्गत लॉकडाऊन कालावधीत बंद असलेल्या औद्योगिक आणि वाणिज्य ग्राहकांच्या विजबीलातील स्थिर आकार पुढील ३ महिन्यांसाठी स्थगीत करुन ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. लॉक डाऊनच्या परिस्थितीमुळे हातावर पोट भरणाऱ्या गोर गरीब सामान्य माणसांच्या समोर प्रचंड अडचणी निर्माण झाल्या आहेत. दररोजच्या जीवनातील जीवनावश्यक वस्तु खरेदी करण्याची ताकदसुद्धा सर्वसामान्य माणसाजवळ राहीली नसल्याने त्यांना घरघुती विजबील भरणे अशक्य झाले आहे. त्यामुळे ,लॉकडाऊन कालावधीतील महाराष्ट्रातील गरीब जनतेचे तीन महिन्यांचे घरघुती विजबील पुर्णपणे माफकरुन गरीब जनतेस दिलासा द्यावा अशी मागणी अनुसूचित जाती विभाग जिल्हा कार्याध्यक्ष नरवाडे यांनी केली आहे.