ग. स. सभासदांना दिवाळीपूर्वी लाभांश अदा करा

 

जळगाव प्रतिनिधी । ग. स. सभासदांना दिवाळीपूर्वी लाभांश अदा करण्यात यावा अशी मागणी सहकार गटातर्फे  अध्यक्षांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनाचा आशय असा की, राज्यपाल यांचे २ नोव्हेंबर २०२० चे अध्यादेश प्रस्थापित केलेले आहेत. त्यानुसार कार्यकारी मंडळ सभेच्या मान्यतेने ग. स. सभासदांना लाभांश अदा करण्यास मान्यता प्रदान केलेली आहे. ३१ मार्च २०२० अखेर संस्थेचा अदमासे १५ कोटी रुपयांचा नफा झालेला असून संचालक मंडळाने आवश्यक असलेल्या तरतुदींची वजावट करून ग. स. सभासदांना किमान १० टक्के लाभांश मिळावा असे नियोजन करावे. तसेच जिल्ह्यातील चाळीस हजार सभासदांच्या मागणीचा विचार करता दिवाळी सणापूर्वी अदा करण्यात यावा अशी मागणी सहकार गटातर्फे करण्यात आली आहे. निवेदनावर सहकार गटाचे नेते उदय पाटील, अजबसिंग पाटील, कैलासनाथ चव्हाण, भाईदास पाटील, महेश पाटील, देवेंद्र पाटील, विक्रमादित्य पाटील, रागिणी चव्हाण, विद्यादेवी पाटील यांची स्वाक्षरी आहे.

Protected Content