जळगाव प्रतिनिधी । कोरोनामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणूका पुढे ढकलल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी पोलीस पाटील यांची निवड करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेच्यावतीने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात कोरोना फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे राज्य शासनाने ग्रामपंचायतीच्या निवडणूका पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे कोरोनाच्या काळात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर जे प्रशासन नेमण्यात येणार आहे. यात पारदर्शक व्यवहारासाठी पोलीस पाटलांची नेमणूक प्राधान्याने करावी, प्रशासक काळात राजकीय व्यक्तींची नेमणूक झाल्यास वाद, तंटे होऊ शकतात. सध्या कोरोनाची जनजागृती समितीत शासनाने सचिवपदी पोलीस पाटील यांची नेमणूक केली असून पोलीस पाटील हे नेमून दिलेली जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पडत आहेत. तरी प्रशासक पदी पोलीस पाटील यांची नेमणूक झाल्यास गावाचा कारभार पारदर्शक व सुरळीत होण्यास मदत होईल. अशी मागणी महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहेत.