मुंबई: वृत्तसंस्था । संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा पत्रकारितेच्या स्वातंत्र्याशी काहीही संबंध नाही. त्यांनी अन्वय नाईक नावाच्या व्यवसायिकाचे पैसे बुडवले. त्यामुळे नाईक यांनी आर्थिक विंवचनेतून आत्महत्या केली. म्हणून अटक झाली , असं शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगितलं.
एका मराठी भगिनीचं कुंकू गोस्वामींमुळे पुसलं गेलं. याचा पत्रकारितेच्या स्वातंत्र्याशी संबंध नाही. मग भाजप नेते गोस्वामींच्या अटकेवरून इतका आरडाओरडा कशासाठी करताहेत? गोस्वामी काय भाजपचा कार्यकर्ता आहे का?, असे प्रश्न परब यांनी विचारले आहेत. अन्वय नाईक यांनी गोस्वामी यांच्यामुळे आत्महत्या केली. भाजप नेते अशा गोस्वामींच्या बाजूनं आहेत का? असतील तर तसं त्यांनी जाहीर करावं, असं शिवसेना नेते अनिल परब म्हणाले.
गोस्वामी यांच्या अटकेवरून ठाकरे सरकारला लक्ष्य करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीदेखील प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे. आम्ही सुडाचं राजकारण करत नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे. कोणीही कायद्याचं उल्लंघन केल्यास पोलीस त्याच्याविरोधात कारवाई करतील,’ असं राऊत म्हणाले. पोलिसांकडे सबळ पुरावे असतील, त्यामुळेच त्यांनी कारवाई केली असेल, असंही त्यांनी म्हटलं.