पणजी वृत्तसंस्था । कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कायम असताना गोवा सरकारने राज्यात प्रवेश करु इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी नियमावली बदलली आहे. गोव्यात प्रवेश करण्यापूर्वी ‘कोरोना’ चाचणी बंधनकारक नसेल. मात्र कोरोना चाचणी करायची नसेल त्यांनी १४ दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा पर्याय गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिला आहे.
ज्यांना गोव्यात प्रवेश करण्यापूर्वी कोरोना चाचणी करायची असेल, त्यांनी अहवाल येईपर्यंत १४ दिवस सशुल्क संस्थात्मक क्वारंटाईन सेंटरमध्ये राहावे. मात्र चाचणी करायची नसल्यास १४ दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा पर्याय असेल. त्यांच्या हातावर शिक्का मारण्यात येईल आणि स्थानिक प्रशासन देखरेख करेल. दहा जून म्हणजेच उद्यापासून नवीन स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) लागू होईल.
जवळपास २५०० चाचण्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. आम्ही दररोज दीड ते दोन हजार चाचण्या घेत आहोत. जे यापुढेही सुरु राहतील, परंतु आम्हाला आगमनासाठी कार्यप्रणाली बदलली पाहिजे” असे सावंत म्हणाले. प्रत्येकाची थर्मल स्क्रीनिंग करण्यात येईल, लक्षणे आढळली, तर मात्र कोविड चाचणी अनिवार्य असेल. वास्कोमधील हॉटस्पॉट मंगोर हिलबद्दल बोलताना सावंत म्हणाले की, गोव्यातील ३०० पेक्षा अधिक कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी २५ वगळता सर्व या (मंगोर हिल) भागातील असल्याची माहितीही त्यांनी दिली.