जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव येथे गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयईईई बॉम्बे स्टुडंट सेक्शन अॅक्टीव्हिटी कमिटीच्या संयुक्त विद्यमाने टेक्नोव्हेशन २०२३ या प्रकल्प स्पर्धेचे थाटात उद्घाटन करण्यात आले.
जळगाव येथे गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयईईई बॉम्बे स्टुडंट सेक्शन अॅक्टीव्हिटी कमिटीच्या संयुक्त विद्यमाने टेक्नोव्हेशन २०२३ या प्रकल्प स्पर्धेचे दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने थाटात उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, गोदावरी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, अधिष्ठाता व आयइइइ स्टुडंट ब्रँचचे समुपदेशक तथा प्रकल्प स्पर्धेचे समन्वयक प्रा. हेमंत इंगळे, डॉ. प्रमोद भिडे, प्रा. दीपक झांबरे, अधिष्ठाता व महाविद्यालय विकास टेक्नोव्हेशन २०२३ चे समन्वयक प्रा. शफीक अंसारी हे उपस्थित होते. दत्तात्रय सावंत पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी हे उत्तम व्यासपीठ असून या स्पर्धेत विजयी होणार्या स्पर्धकांना कोपरगाव येथे दि. १५ एप्रिल रोजी होणार्या अंतीम फेरीत सहभागी होता येणार आहे. टेक्नोव्हेशन या स्पर्धेचे गोदावरी अभियांत्रिकीच्या टीमने उत्तम आयोजन केल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. प्रमोद भिडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
मास्टर माइंड होण्याची सुवर्णसंधी – डॉ. उल्हास पाटील
विद्यार्थ्यांमधील बौध्दीक क्षमता ओळखण्यासाठी आणि त्यांचे कौशल्य सादर करण्यासाठी ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आयुष्यात तुम्ही स्वत:ला कसे सादर करता हे खूप महत्वाचे आहे. प्रत्येकाला एक सिक्स सेन्स असतो, आयडीया असते. या सिक्स सेन्सचा आणि कल्पना शक्तीचा वापर करण्यासाठी हे व्यासपीठ आहे. त्यासांठी सातत्य आणि कठोर परिश्रम हे आवश्यक आहेत. टेक्नोव्हेशन स्पर्धेच्या माध्यमातून विविध भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना आपले विचार आणि विविध कल्पना आदान-प्रदान करता येणार आहे. जागतिक व्यक्तीमत्व होण्याची ही एक नवीन सुरूवात असून प्रकल्प स्पर्धा ही मास्टर माइंड होण्याची सुवर्णसंधी असल्याचा सल्ला माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना दिला. दरम्यान गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील टीम ही माझ्या अपेक्षेपेक्षाही सर्वोत्तम काम करीत असल्याचे गौरवोद्गारही डॉ. उल्हास पाटील यांनी व्यक्त केले. उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी केले.
३१ प्रकल्पांचे सादरीकरण
जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. यात एकूण ३१ प्रकल्प प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले असून सुमारे १११ विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रकल्पांचे प्रदर्शन भरविले. यात गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील ११ प्रकल्प आहे.