मुंबई : वृत्तसंस्था । नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन महिलांना अटक केली या महिलांनी गुप्तांगात सोन्याच्या पुड्या लपवल्या होत्या. या तीनही महिला केनियाच्या नागरिक आहेत.
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी विमानतळावर सापळा रचला होता. यावेळी या तीन महिलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता तस्करीचा प्रकार उघडकीस आला. सोनं तस्करी ही कारवाई कस्टम विभागाशी संबंधित असल्याने या तीन महिलांना कस्टमच्या हवाली करण्यात आलं आहे.
झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना काही महिला परदेशातून ड्रग्स घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार समीर वानखेडे आणि त्यांचं पथक विमानतळावर पाळत ठेवून होतं. दोहा येथून मुंबईत येणाऱ्या विमानात या व्यक्ती असल्याची माहिती होती. त्यानुसार तीन महिला आल्या असता त्यांना ताब्यात घेण्यात आलं.
आरोपी महिलांना मुंबई विमानतळावर ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपल्याला त्रास होत असल्याचं एनसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं. त्यानंतर या महिलांना जे जे हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांना वैद्यकीय मदत देण्यात आली. यावेळी त्या महिलांनी खरी परिस्थिती सांगितली.
या महिलांनी त्यांच्या गुप्तांगात वस्तू लपवली असल्याचं सांगितलं. डॉक्टरांच्या मदतीने त्या लपवलेल्या वस्तू काढण्यात आल्या. काढण्यात आलेली वस्तू हे सोनं होत. त्या तीन महिलांकडून 938 ग्राम सोनं जप्त करण्यात आलं आहे. 13 पाकिटात सोन्याचे 17 तुकडे लावण्यात आले होते. हे तुकडे 20 ग्राम ते 100 ग्रामचे होते.