धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये शिवजयंती निमित्त वैचारिक प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जि. एस. ए. स्कुल येथे कार्यक्रम घेण्यात आला. सर्वप्रथम शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे यांनी राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंच्या प्रतिमेला व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांनी विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. अमोल सोनार सरांनी शिवचरित्रातील काही प्रसंग सांगून आदर्श राजा कसा असावा याचे उदाहरण म्हणजे शिवराय असे प्रतिपादन केले.
लक्ष्मण पाटील यांनी विद्यार्थ्यांना वैचारिक प्रबोधन करतांना सांगितले की, शिवजयंती नाचून नाही तर वाचून साजरी केली पाहिजे. जेव्हा एखादी वस्तू आपण माझी म्हणतो तेव्हा तिची काळजी देखील आपण स्वतः घेत असतो. छत्रपतींनी आपल्या राज्याला स्वतःचे नाव न देता ‘स्वराज्य’ असे नाव दिले कारण स्व म्हणजे माझं म्हणून शिवरायांच राज्य इथल्या प्रत्येकाला आपलं वाटत होतं. शिवरायांनी विविध जाती – धर्माच्या लोकांना एकाच शब्दांत गुंफण्याचं महत्वपूर्ण काम केलं आणि तो म्हणजे मावळ… तलवारीने माणूस मारता येतो परंतु विचारांनी माणूस जगवता येतो. शिवरायांनी विचार पेरण्याचं आणि माणसं जोडण्याचं काम केलं , असं प्रतिपादन पाटील सरांनी केलं. कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्या , शाखा व्यवस्थापक , सर्व शिक्षकवृंद , विद्यार्थी – विद्यार्थीनी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल सोनार सरांनी केले.