मुंबई : वृत्तसंस्था । आणीबाणी चूक होती आणि त्या काळात जे काही घडलं तेदेखील चुकीचं होतं, असं म्हणत राहुल गांधी यांनी इंदिरा गांधी यांच्या निर्णयावर भाष्य केलं. आता याच विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला गुजरात दंगलीची आठवण करून दिली आहे.
विधानभवन परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले,”आणीबाणीचा निर्णय चुकीचा होता, हे राहुल गांधी यांनी ४५ वर्षांनंतर स्वीकारलं. काँग्रेसनं कुठे न कुठे आपली चूक मान्य केली आहे. दिल्लीतील दंगलीबद्दल माफी मागितली. आता भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेळ आहे. गुजरातमधील दंगल कुठे न कुठे चुकीची होती, हे त्यांनी मान्य करावं. भाजपाला आम्ही पुन्हा एकदा विचारतोय… जर काँग्रेस आपल्या चुका सुधारत असेल, तर ते कधी चुका सुधारणार हे लोकांना सांगावं,” असा सवाल नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला केला आहे.
तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. याविरोधात देशभरात आंदोलन पेटलं होतं. इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीवरून आजही काँग्रेसवर टीका केली जाते. याच निर्णयाबद्दल राहुल गांधी यांनी ती एक चूक होती, असं म्हटलेलं आहे.
“मला वाटतं ती (आणीबाणी) एक चूक होती. नक्कीच ती चूक होती. पण आणीबाणीच्या काळात जे काही झालं आणि सध्या जे काही सुरु आहे त्यात मुलभूत फरक आहे. काँग्रेस पक्षाने कधीही घटनात्मक चौकट आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला नाही. तशी आपल्याला परवानगीदेखील नाही. आपली इच्छा असली तरी आपण करु शकत नाही,” अशी भूमिका राहुल गांधी यांनी प्रसिद्द अर्थशास्त्रज्ञ कौशिक बासू यांच्याशी चर्चा करताना मांडली.