गिरीश महाजन सध्या लहान — नाना पटोले

 

भंडारा : वृत्तसंस्था ।  “भाजप नेते गिरीश महाजन हे सध्या लहान आहेत. त्यांच्या वक्तव्यावर बोलण्याची गरज नाही,” असा खोचक टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांना लगावला.

 

दिग्गज अभिनेते अभिताभ बच्चन  आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे चित्रीकरण होऊ देणार नाही, अशी रोखठोक भूमिका नाना पटोले यांनी घेतली होती. त्यांच्या या भूमिकेनंतर गिरीश महाजन यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली होती. या राज्यात मोगलाई चालू आहे का?, असा खोचक सवाल त्यांनी केला होता. त्यानंतर नाना पटोले यांनी वरील प्रतिक्रिया दिली. ते भंडाऱ्यात बोलत होते.

 

 

यावेळी “भारतमातेच्या नावावर भाजप पक्ष मोठा झाला. त्याच भारतमातेला विकण्याची सुरुवात भाजपने केली आहे. गिरीज महाजन हे सध्या लहान आहेत. त्यांच्या वक्तव्यावर काही बोलण्याची गरज नाही,” असे नाना पटोले म्हणाले.

 

काही दिवसांपासून इंधन दरवाढ, शेकऱ्यांचे प्रश्न यावरुन काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. याच मुद्द्यांना घेऊन “मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात सिने अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते. मात्र आता त्यांनाही विसर पडल्याने भविष्यात काँग्रेस अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे चित्रिकरण महाराष्ट्रात होऊ देणार नाही तसेच त्यांचे सिनेमे प्रदर्शितही होऊ देणार नाही,” असे वक्तव्य नाना पटोले यांनी  केले होते.

 

त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात चांगलीच खळबळ उडाली होती. पटोले यांच्या या भूमिकेचा भाजपणे निषेध केला होता. त्यावर बोलताना मी माझी भूमिका अजूनही बदलली नसल्याचे नाना पटोले यांनी म्हटलंय. “जिथे अमिताभ आणि अक्षय यांचा चित्रपट सुरु असेल, तिथे काँग्रेस काळे झेंडे दाखवेल, असे नाना पटोले म्हणाले.

Protected Content