मुंबई प्रतिनिधी । आधुनिक भारत निर्मितीचे काम गांधी व नेहरूंनी केले असले तरी त्यांना आज बदनाम केले जात असल्याचे नमूद करत आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी आज सामनातील रोखठोकमध्ये भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, कर्नाटकातील भाजपचे नेते अनंतकुमार हेगडे यांनी जाहीर केले की, गांधीजी हे ब्रिटिशांचे एजंट होते व त्यांची स्वातंत्र्य चळवळ भाडोत्री होती. हे विधान अस्वस्थ करणारे आहे. भोपाळच्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांनीही मधल्या काळात गांधींवर थुंकण्याचा प्रकार केला व गोडसे त्यांचा आदर्श असल्याचे सांगितले. पण हेगडे आणि साध्वी प्रज्ञा यांची गांधीजींविषयीची मते वैयक्तिक असल्याचे भाजपकडून जाहीर केले. मधल्या काळात महाराष्ट्रात गोडसेंची पुण्यतिथी साजरी झाली तर उत्तर प्रदेशात गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडून गोडसेंना श्रद्धांजली वाहण्यात आली. हिंदुस्थानात गांधी जन्मास आले त्याची मोठी किंमत ते हत्येनंतर ७० वर्षांनीही चुकवत आहेत.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, गांधींची यथेच्छ बदनामी करणे, त्यांच्या हेतूवर शंका घेणे, चारित्र्यावर चिखलफेक करणे, त्यांचे पुतळे पाडणे, पुतळ्यांवर गोळ्या झाडणे हे पाप आहे. पण हेगडे व प्रज्ञा यांना असे पाप करण्याचे स्वातंत्र्य व अधिकार गांधींमुळे प्राप्त झाले हे लक्षात घेतले पाहिजे. गांधीजींएवढी असामान्य व्यक्ती या देशात होऊन गेली, परंतु त्यांच्या गुणांचे चीज आपण पुरेसे करू शकलो नाही. आपण गांधीजींचा खून केला व मृत्यूनंतरही त्यांच्यावर गोळ्या मारण्याचा षंढपणा करीत राहिलो. गांधींमुळे देश तुटला असे ज्यांना वाटते त्यांनी तो पुन्हा अखंड करावा. तसे करण्यापासून त्यांना कोणीच रोखलेले नाही. तिकडे पाकिस्तानात बॅ. जीना कबरीत शांतपणे विसावले आहेत. पाकिस्तानचा साफ नरक बनला, पण त्याचा दोष कोणी बॅ. जीनांच्या माथी मारत नाहीत. पण गांधी-नेहरूंनी एक आधुनिक भारत निर्माण केला. त्यांना रोज मारले जात आहे. हेसुद्धा एक स्वातंत्र्यच आहे. हिंदुस्थानची अवस्था पाकिस्तानसारखी झाली नाही याचे श्रेय गांधी, नेहरू व पटेलांसारख्या काँग्रेस नेत्यांकडे जाते. त्यांच्यावर चिखलफेक करण्याचे पाप जे करीत आहेत ते पाप करण्याचे स्वातंत्र्यसुद्धा गांधींजींनीच मिळवून दिले. एवढे तरी लक्षात ठेवा असे संजय राऊत यांनी बजावले आहे.