जळगाव प्रतिनिधी । मुक्ताईनगरातून सुमारे ६३६ किलो गांजाची बेकायदेशीर वाहतूक करणारा ट्रक एमआयडीसी पोलीसांनी पकडला होता. यात ट्रकसह चालकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अजून तीन संशयित आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. या गांजा तस्करीत मुख्य सुत्रधार अजून फरार आहे.
मुक्ताईनगरातून ट्रकमध्ये येणारा ६३६ किलो गांजा एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी पकडला. ३८ लाख १६ हजार रुपये किमतीचा हा गांजा आहे. दरम्यान, अटकेतील ट्रकचालक मुख्तार रहीम पटेल (वय २४, रा.लोहारा, ता.बाळापुर, जि.अकोला) दिलेल्या माहितीवरुन आता आशिक सुलेमान पटेल, अरमान चिंधा पटेल, आशिक शेख या तीघांची नावे समोर आली आहेत. यातील दोघे तांबापुर तर एक मास्टर कॉलनीतील रहिवासी आहे. मजुरी करणाऱ्या या तीघांची नावे मोठ्या प्रकरणात समोर आली आहेत. तीघे बेपत्ता आहेत.
झाडांची वाहतूक करण्याच्या नावाखाली ट्रकमधुन (एमएच ४२ टी ९१२५) मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होत असल्याची माहिती पोलसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करीत पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला. ट्रकचालक मख्तार पटेल याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार हा गांजा अरमान, आशिक पटेल व आशिक शेख या तीघांनी मागवला होता. हे तीघे मुक्ताईनगरपासून एका चारचाकीने (एमएच १८ एजे २५०७) ट्रकच्या मागे येत होते. परंतू, भुसावळपासून ते चारचाकीसह बेपत्ता झाले. तर हा ट्रक जळगावात पोलिसांनी पकडला. दरम्यान, आता समोर नाव आलेला अरमान हा पूर्वी चित्रपटांच्या सीडी (कॉम्पॅक्ट डिस्क) विक्री करायचा तर सध्या धान्य विक्री करत होता. तर आशिक शेख व आशिक पटेल हे दोघे गॅरेजवर मॅकेनिक म्हणून काम करतात. तीघांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे.
अशात त्यांनी चक्क ३८ लाख रुपयांचा गांजा मागवला कसा?, त्यांच्याकडे एेवढे पैसे आलेच कसे?, त्यांच्या मागे असलेला सुत्रधार कोण? हे नवीन प्रश्न आता समोर आले आहेत. पोलिस उपअधिक्षक डॉ.निलाभ रोहन यांच्यासह एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या पथकाने बुधवारी तीघांच्या घरी झडती घेतली. एका खोलीच्या घरात राहणाऱ्या या तीघांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे पोलिसांना देखील दिसून आले.