जळगाव प्रतिनिधी । महामार्गालगत असलेल्या गंधर्व कॉलनीत चोरट्यांनी मंगळवारी रात्री एक बंद घर फोडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने शेजारचे लोक झोपेतून जागे झाल्यामुळे चोरटे पळुन गेले. त्यानंतर त्यांनी याच परिरातील दुसरे एक घर फोडले. परंतु, चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
अधिक माहिती अशी की, गंधर्व कॉलनीतील व्ही. एम. पाटील हे कुटुंबीयांसह बाहेरगावी गेलेले आहेत. ही संधी साधुन चोरट्यांनी मंगळवारी रात्री १२.३० वाजता त्यांच्या घराच्या मागच्या चॅनलगेटचे कुलूप तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी लोखंडी गेटचे कुलूप तोडत असताना आवाज झाल्यामुळे शेजारी राहणारे लोक झोपेतून जागे झाले. त्यांनी बाहेर येऊन लाईट सुरू केल्यामुळे चोरट्यांनी पाटील यांच्या अंगणातून धुम ठोकली. यांनतर चोरटे पुन्हा या घराकडे आले नाहीत. काही वेळाने चोरट्यांनी याच परिसरातील सुरेश विश्वनाथ अकोले यांचे बंद घर फोडले. अकोले दाम्पत्य बाहेरगावी गेलेले असल्याने त्यांचेही घर बंद होते. चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त केले. परंतु, त्यांना घरातून काहीच ऐवज मिळाला नाही. नागरीकांनी घटोची माहिती जिल्हापेठ पोलिसांना दिल्यानंतर पथकाने या परिसरात तपासणी केली.