खोट्या माहितीमुळे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फेसबुकवर संतापले

वाशिंग्टन :  वृत्तसंस्था ।  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सोशल नेटवर्कींग कंपन्यांच्या खोट्या माहितीमुळे  माणसं मरत असल्याचं वक्तव्य केलं आहे. 

 

सोशल नेटवर्किंग साइटवरील खोट्या माहितीला अनेकजण बळी पडतात आणि त्यात त्यांचा प्राण जातो असं बायडन करोना लसीकरणासंदर्भातील आपल्या भाषणात म्हणाल्याचं वृत्त  आहे.

 

अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टर विवेक मूर्ती यांनी खोटी माहिती ही लसीकरण मोहिमेसाठी घातक ठरु शकते असं मत व्यक्त केल्यानंतर बायडन यांनी हे वक्तव्य केलं आहे. खोट्या माहितीमुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. अमेरिकेतील नागरिकांमध्ये विषाणूचा मोठ्याप्रमाणात होणारा प्रादुर्भाव आणि त्यांचे गंभीर परिणाम हे केवळ लसीकरणाच्या माध्यमातून टाळता येऊ शकतात असं मत मूर्ती यांनी व्यक्त केलं होतं.

 

एका पत्रकार परिषदेदरम्यान याचसंदर्भात बायडन यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. खोटी माहिती पसरवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्ससाठी तुमचा काही संदेश आहे का?, असं पत्रकारांनी बायडन यांना विचारलं. त्यावर उत्तर देताना बायडन यांनी, “ते लोकांना मारत आहेत,” अशी संतप्त प्रतिक्रिया दिली. सध्या आपल्याकडे केवळ लसीकरण न झालेल्यांना साथीचा प्रादुर्भाव दिसून येतोय. असंही बायडन म्हणाले.

 

मूर्ती यांनी कोरोनासंदर्भातील चुकीची माहिती ही इम्फोडॅमिक म्हणजेच चुकीच्या माहितीची साथ असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचा संदर्भ देत सांगितलं. हा इम्फोडॅमिक धोकादायक आहे असं मूर्ती म्हणाले. मूर्ती हे अमेरिकेच्या कोरोना टास्क फोर्सचे सदस्य आहेत.

 

 

“चुकीच्या माहितीमुळे आपल्या देशातील आरोग्य व्यवस्थेला मोठा आणि गंभीर धोका आहे,” असं मूर्ती म्हणाले. “माहितीवर अनेकांचे जीव अवलंबून असतात. त्यामुळे एक देश म्हणून आपण चुकीच्या माहितीविरोधात एकत्र आलं पाहिजे,” असंही मूर्ती यांनी स्पष्ट केलं. खोटी, चुकीची माहिती पसरवण्यामध्ये तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल बोलताना मूर्ती यांनी कंपन्यांनी, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसने त्यांच्या प्रोडक्टमध्ये आवश्यक ते बदल करुन चुकीच्या माहितीचा प्रसार होणार नाही आणि योग्य माहितीची लोकांपर्यंत पोहचेल याची काळजी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा मूर्तींनी व्यक्त केली.

 

अनेकदा हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चुकीची माहिती जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी फायदेशीर ठरतील अशापद्धतीने डिझाइन केलेले असतात. आम्ही आता कंपन्यांना यासंदर्भात उपाययोजना करण्याचा सल्ला दिलाय. आम्ही कंपन्या स्वत:हून काही करतील यासाठी वाट पाहत बसणार नाही, असंही मूर्ती म्हणालेत. बायडन यांच्या वक्तव्यानंतर फेसबुकने आरोप फेटाळून लावत आम्ही लोकांना वाचवण्यासाठी मदत करत असल्याचं स्पष्ट केलं आहे.

 

 

फेसबुकचे  दानी लिवर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आमच्यावर कोणतेही पुरावे नसताना करण्यात आलेल्या आरोपांमुळे आम्ही विचलीत होणार नाही. खरं तर हे आहे की दोन बिलीयनहून अधिक लोकांनी कोरोनासंदर्भातील आणि लसीकरणाबद्दलची योग्य माहिती आमच्या माध्यमातून पाहिलीय. इंटरनेटवर इतर कोणत्याही माध्यमावर एवढ्या लोकांनी ही माहिती पाहिली नाही,” असं लिवर म्हणालेत. ट्विटरनेही जगभरामध्ये कोरोनाचा फैलाव होत असताना आम्ही जास्तीत जास्त योग्य माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं म्हटलं आहे.

 

Protected Content