जळगाव प्रतिनिधी । दारू पित असतांना जुन्या वादातून खोटे नगरात २२ वर्षीय तरूणाचा चाकूने वार करून खून केल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती. गुन्ह्यातील एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून तालुका पोलीसात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .
महेश वासूदेव पाटील (वय-२२) रा. हिराशिवा कॉलनी असे मयत तरूणाचे नाव आहे. तर गजेंद्र उर्फ गोलू युवराज सुर्यवंशी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. सविस्तर माहिती अशी की, शहरातील खोटे नगर भागातील हिराशिवा कॉलनीतील पाण्याच्या टाकीजवळ महेश पाटील, त्याचे मित्र बापु संतोष राजपूत, मयुर नरेंद्र पाटील, गजेंद्र उर्फ गोलू युवराज सुर्यवंशी सर्व रा. हिराशिवा कॉलनी आणि इश्वर अशोक पाटील रा. पिंप्राळा हे सर्वजण शनिवारी ११ जुलै रोजी रात्री ८ ते ९ वाजेच्या दारू पित होते. दारू पित असतांना महेश पाटील आणि बापू राजपूत यांच्या वाद झाला. यात मयूर, ईश्वर आणि गजेंद्र यांनी महेशला पकडून ठेवले होते. त्यात बापु राजपूतने धारदार शस्त्र काढून महेशच्या मानेवर, छातीवर सपासप वार करून खून केला. मुलाचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात हंबरडा फोडला होता. आज सकाळी जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान मयत महेशचे वडील वासूदेव मुरलीधर पाटील यांच्या फिर्यादीवरून चौघांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील संशयित आरोपी गजेंद्र उर्फ गोलु युवराज सुर्यवंशी याला पोलीसांनी अटक केली. आज संशयित आरोपी गजेंद्र सुर्यवंशी याला जिल्हा न्यायालयात न्या. व्ही.एस.जोशी यांच्या न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.