पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गेल्या अनेक दिवसांपासून कडाक्याच्या उष्णतेने हैराण झालेल्या राज्यातील जनतेला लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाल्याची घोषणा आज हवामान खात्यातर्फे करण्यात आली आहे.
राज्यात यंदा अतिशय कडाक्याचा उन्हाळा होता. अनेक ठिकाणी जवळपास दीड महिन्यांपासून ४० अंशापेक्षा जास्त तापमान होते. काही दिवस तर पारा ४५ अंशाच्या पार गेला होता. यामुळे नेमका पाऊस केव्हा पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यातच जून महिना लागला तरी मान्सूनचे आगमन न झाल्याचे चिंतेचे वातावरण होते. या पार्श्वभूमिवर, आज राज्यात नैऋत्य मौसमी वार्यांनी अर्थात मान्सूनने एंट्री केल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
केरळमध्ये ८ जून रोजी मान्सून आला होता, त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत राज्यात मान्सून दाखल झाला आहे. पुणे हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यानी ट्विट करत मान्सूनचे आगमन झाल्याची माहिती दिली. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, नैऋत्य मान्सूनचे ११ जूनला महाराष्ट्रात आगमन झाले आहे. दक्षिण कोकणातील काही भाग, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग, संपूर्ण गोवा,कर्नाटक, तामीळनाडू अन् आंध्रप्रदेशचा् काही भाग मान्सूनने व्यापला आहे. तर, आता शेतकरी बांधवानी मशागतीची कामे पूर्ण करावी अन् पेरणीसाठी तयार राहावे, परंतु पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करु नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.