नवी दिल्ली । अलीकडेच आमदार निधीत वाढ झाल्यानंतर आता खासदार निधीतदेखील भरघोस वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात संसदीय समितीने शिफारस केली असून यावर लवकरच निर्णय होऊ शकतो.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आमदार निधीची मर्यादा वार्षिक दोन कोटींवरून तीन कोटी इतकी करण्याची घोषणा अलीकडेच केली होती. यानंतर आता खासदार निधीदेखील वाढणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यासाठी संसदीय समितीनं सरकारकडे एक शिफारस केली आहे. खासदारांचा निधी पाच कोटी रुपयांवरून वाढवून १० किंवा १५ कोटी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. संसदेच्या बजेटचा अंदाज आणि खासदारांच्या निधीसाठी खर्च होणार्या रकमेचा अंदाज घेऊन त्याचं मूल्यांकन करा, असं संसदीय समितीनं केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम क्रियान्वयन मंत्रालयाला सांगितलं आहे. संसदेत कालच हा अहवाल सादर करण्यात आला आहे. खासदारांचा निधी दुप्पट किंवा तिप्पट करण्याची मागणी आधी पासूनच करण्यात येत असून आता या मागणीच्या पूर्ततेच्या दिशेने पाऊल पडल्याचे दिसून येत आहे.