खासगीकरणाच्या विरोधात बँक संघटनांचा देशव्यापी बंद

 

नवी दिल्ली । वाढत्या खासगीकरणाला विरोध म्हणून बँक संघटनांनी देशव्यापी संपाची हाक दिली असून १५ व १६ मार्च रोजी बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.

 मार्च महिन्यात अनेक बँक संघटनांनी सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात दोन दिवस संप पुकारला आहे. हा संप १५ आणि १६ मार्च रोजी घेण्यात येणार आहे. दरम्यान, १४ मार्च हा रविवार असेल आणि १३ मार्च हा महिन्याचा दुसरा शनिवार असेल ज्यामुळे बँका बंद राहतील. यामुळे १३ ते १६ मार्च दरम्यान बँका सलग चार दिवस बंद राहतील.  

२०२१ च्या अर्थसंकल्पात सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँक आणि एक विमा कंपनीचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या देशात १२ सरकारी बँका आहेत. त्यानंतर त्यांची संख्या १० वर जाईल. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये दोन बँकांचे खाजगीकरण केले जाईल. पुढील आर्थिक वर्षासाठी सरकारने निर्गुंतवणुकीचे आणि खासगीकरणाचे लक्ष्य १.७५ लाख कोटी रुपये ठेवले आहे. याला कर्मचारी संघटनांनी विरोधी केल्यानेच देशव्यापी संप पुकारण्यात आलेला आहे.

Protected Content