पाचोरा, प्रतिनिधी । येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेतील ग्राहक सूर्यभान बाविस्कर यांचे अपघाती निधन झाले होते. केवळ या बँकेत बचत खाते असल्याचा फायदा त्यांच्या परिवाराला मिळवून देत व्यवस्थापनाने पाच लाख रुपये विमा रक्कम मिळवून दिली आहे
या शाखेतील व्यवस्थापकांसह त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम करून बाविस्कर यांच्या परिवाराला विमा रक्कम मिळवून दिली आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सन – २०१४ पासून भारतातील सर्व सरकारी सहकारी व खाजगी बँकांमधील ग्राहकांना विमा सुरक्षा योजना लागू करण्यात आलेली आहे. बँक खातेदाराच्या मृत्यूला संरक्षण देणारी प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (पी. एम. एस. बी. वाय.) असून यासाठी वयोमर्यादा १८ ते ७० वर्षे आहे कोणत्याही बँकेत आपले बचत खाते असल्यास तुम्हाला योजनेच्या माध्यमातून दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण प्राप्त झाले आहे
बचत खातेदाराच्या मृत्यूला संरक्षण देणारी प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना (पी. एम. जे. जे. बी. वाय.) असे या योजनेचे नाव आहे. यासाठी वयोमर्यादा १८ ते ५० वर्षे, खातेदाराच्या खात्यामधून वार्षिक ३३० रुपये हप्ता कपात होत असल्यास प्रत्येक खातेदाराला हे विमा संरक्षण लागू आहे.
प्रत्येक आर्थिक वर्षाच्या अखेरीस तुमच्या बचत बँक खात्यातून या योजनांची सुरक्षा प्राप्त करण्यासाठी पहिल्या योजनेत वार्षिक १२ रुपये व दुसऱ्या योजनेसाठी वार्षिक ३३० रुपये हप्ता कपात होतो. हा विमा सुरक्षा हप्ता ऑनलाइन कपात होत असल्याने बहुतांशी ग्राहकांना याबाबत कल्पना नसते. हप्ता कपातीचे अज्ञान असल्यामुळे अनेकांना प्रधानमंत्री पुरस्कृत दोन्ही विमांचा लाभापासून वंचित राहावे लागते. मयत ग्राहकाच्या परिवाराला विमा सुरक्षा मिळवून देण्याची जबाबदारी संबंधित बँक प्रशासनाची असली तरी अत्यावश्यक कागदपत्रे व दाखले यांची पूर्तता करण्याचे काम संबंधित वारसदारांचे असते.
विमा क्लेम सेटलमेंट मिळवून देणे ही प्रक्रिया किचकट असल्याने अनेकदा बँक प्रशासन असे विमा दावे हाताळण्याचे टाळते. मात्र पाचोरा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम करून मयताच्या परिवाराला तब्बल पाच लाख रुपये विमा रक्कम मिळवून दिली आहे.
बँकेत बचत खाते असून त्याद्वारे तुम्ही एटीएम कार्ड वापरत असाल तर प्रत्येक जूने ए.टी.एम. कार्ड धारकाला एक लाख रुपयाचे तर नवीन प्लॅटिनम ए.टी.एम. कार्ड धारकाला दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येते. पाचोरा येथील प्रकरणात संबंधित विमाधारकाकडे जुने एटीएम कार्ड असल्याने एक लाख रुपयाचा विमा त्याच्या वारसांना मिळाला.
सूर्यभान बाविस्कर यांनी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना काढल्यामुळे बँकेने दोघं क्लेमच्या पाठपुरावा करून सदर वारसास सर्व पैसे मिळवून दिले. शिवाय “रुपे ए.टी.एम. कार्ड” वरील इन्शुरन्स सुद्धा बँकेने पाठपुरावा करून वारसास मिळवून दिला.
*ग्राहकाच्या वारसाने (संगीता बाविस्कर) फक्त १२ व ३३० रुपयांच्या विम्यासाठी प्रोसेस केली होती. पण शाखा व्यवस्थापकाने त्यांना रूपे कार्डच्या विम्याबाबतही अवगत करून त्यांना त्यासाठी आवश्यक कागदपत्रे मागवून त्याही विम्याचा लाभ मिळवुन दिला.
महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा पाचोरा यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की ही योजना सन – २०१४ पासून भारत सरकारने सुरू केली आहे अनेक सामान्य नागरिक यापासून वंचित आहेत तरी ज्या व्यक्ती ह्या योजनेत समाविष्ट नाहीत त्यांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा अशा प्रकारे एकूण पाच लाख रुपये मिळवून दिल्याबद्दल मयत ग्राहकाच्या वारस (पत्नी) संगीता बाविस्कर यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ऋण व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र ग्रामीण बँक, पाचोरा शाखेतील ग्राहक सूर्यभान बाविस्कर यांच्या अपघाती निधनानंतर कोविड – १९ परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी विमा संरक्षणाचे कागदपत्रे जुळवाजुळव करण्यास विलंब लागला. अशाही परिस्थितीत बँक प्रशासनाने क्लेम सेटलमेंट पूर्ण करून दिले. अत्यंत संवेदनशीलतेने हे प्रकरण हाताळून बँकेच्या ग्राहकाला न्याय मिळवून देणारे शाखा व्यवस्थापक जयंत अमृतकर, बँक अधिकारी प्रसाद दुसाने, रोखपाल मंदार साखरे व विशेष मेहनत घेणारे कंत्राटी सेवक हितेश महाजन यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.