धरणगाव (प्रतिनिधी) नवे गाव परिसरातील कोरोना बाधीत आढळून आलेल्या महिलेच्या संपर्कातील क्वॉरंटाईन केलेल्या १७ जणांपैकी ७ जणांचे अहवाल पॉझीटिव्ह तर १० जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती प्रांतधिकारी विनय गोसावी यांनी दिली आहे. दरम्यान, आता शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ९ वर पोहचली आहे.
शहरातील खत्री गल्ली परिसरात सोमवारी रात्री दुसरा कोरानाबाधित रूग्ण आढळून आला होता. तत्पूर्वी १६ मे रोजी शहरातील लहान नवेगाव व चिंतामण मोरया परिसरात वास्तव्य असलेल्या एका वृध्द महिलेचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. या महिलेचे स्वॅब सँपल 13 तारखेला घेण्यात आले होते. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून या कोरोनाग्रस्त महिलेच्या कुटुंबातील १७ सदस्य क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांना धरणगाव येथील अधिग्रहीत करण्यात आलेल्या वसतीगृहात ठेवण्यात आले होते. या सर्वांचे स्वॅब सँपल घेण्यात आल्यानंतर धुळे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. आज यापैकी ७ जणांचे अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत. तर १० जणांचा अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सुदैवाने निगेटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये दोघां डॉक्टरांचा समावेश आहे. दरम्यान, नवेगाव भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून आधीच घोषित करण्यात आला आहे. तसेच पालिका प्रशासनानेही आधीच उपाय योजना केल्या आहेत. धरणगाव सारख्या छोट्या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव अचानक उफाळून आल्यामुळे शहरात भीतीचे वातावण पसरले आहे.