मुंबई प्रतिनिधी । एकनाथराव खडसे यांनी पक्ष सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पोहोचल्याची माहिती आज पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आज दुपारी दिली. यानंतर पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एकनाथराव खडसे यांचा राजीनामा पक्ष कार्यालयात पोहोचला असल्याची माहिती दिली. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या
एकनाथराव खडसे यांना समजावण्याचा खूप प्रयत्न करण्यात आले. आम्ही शेवटपर्यंत त्यांच्याशी बोलत होतो, पण यात यश आले नाही, असे सांगत केशव उपाध्ये यांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, तर भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांच्या संपर्कात असल्याच्या वृत्ताला त्यांनी साफ नकार दिला.
एकनाथराव खडसे हे खूप मोठे नेते आहेत. पक्षाच्या वाटचालीमध्ये त्यांचा मोठा हातभार आहे, हे कुणीही नाकारू शकणार नाही. मात्र अशाच प्रकारे अनेक नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधून पक्ष घडत असतो असे देखील उपाध्ये म्हणाले.