मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. हेमंत महाजन तर प्रमुख मार्गदर्शक इंग्रजी विभाग प्रमुख डॉ गणेश चव्हाण व हिंदी विषयाचे माजी विभाग प्रमुख डॉ. इस्माइल शेख उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांनी माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
आपल्या मार्गदर्शन भाषणात डॉ चव्हाण यांनी ‘स्पर्श व दृष्टी यांच्या माध्यमातून साधलेला वेध म्हणजे वाचन होय’ असे सांगून विद्यार्थ्यांच्या मनात नवचैतन्य निर्माण केले. तसेच वाचाल.. तर वाचालच.. शिवाय स्पर्धेच्या युगात टिकाल असे भावनिक आवाहन केले. त्याचबरोबर डॉ. शेख यांनी हिंदी विषयातील संत कबीर पासून प्रेमचंद पर्यंत नावाजलेल्या साहित्यकृतीवर चर्चा करून विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी प्रवृत्त केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. महाजन यांनी आजच्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त डॉ कलाम यांचे ‘अग्निपंख’ पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्यांने वाचून ‘आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार बनले पाहिजे’ असे आवाहन केले. तसेच ‘दैनिक वर्तमानपत्र म्हणजे ज्ञानाचा खजिना असून ते दररोज वाचून जगाबरोबर चालायला नव्हे तर जगायला शिका’ असे प्रेरणादायी विचार मांडले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ अनिल पाटील तसेच विदयार्थी विकास अधिकारी डॉ. संजीव साळवे व डॉ. प्रतिभा ढाके यांनी केले.या कार्यक्रमाला ग्रंथालयाचे अधिक्षक प्रा.नरेंद सरोदे, प्रा. सौ.सी.डी. खर्चे, प्रा. पंडित चौधरी, प्रा. दत्तात्रय कोळी तसेच अनेक प्राध्यापकांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन एस एस कार्यक्रम अधिकारी व मराठी विभाग प्रमुख डॉ. दीपक बावस्कर यांनी, प्रास्ताविक डॉ. ताहीरा मीर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. विजय डांगे यांनी केले. या कार्यक्रमाला प्राध्यापक, विदयार्थी व कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.