चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील खडकी गावातून पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण करून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील खडकी येथील गावात सचिन अशोक पवार (वय-१५) हा मुलगा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १ जून रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास सचिन पवार हा घरात एकटा असतांना अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण करून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. सचिनचे वडील अशोक पावार यांनी परिसरात, त्याचे मित्र आणि नातेवाईकांडे शोधाशोध केली परंतू तो कुठेही आढळून आला नाही. अखेर ४ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले करीत आहे.