भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील खडका परिसरात एक संशयित आरोपी गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्यावरून जळगाव स्थानिक गुन्हा शाखा व बाजारपेठ पोलीस स्टेशन पोलीस यांच्या पथकाने छापा टाकून एका आरोपीस अटक केली आहे.
खडका परिसरामध्ये एकाकडे गावठी कट्टा असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, डीवायएसपी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. यात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक, सहा. फौजदार राजेंद्र पाटील , पो. हे.कॉ. कमलाकर बागुल, रवींद्र पाटील, इद्रीस पठाण, बाजारपेठ पोलिस स्टेशनचे रमण सुरडकर, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी आदींनी आज कारवाई केली. यात संशयित आरोपी रोशन भीमराव सपकाळे ( रा. खडका ) यास खडका- किन्ही रस्त्यावर पाण्याच्या टाकीजवळ अटक केली आहे. आरोपीस तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.