अमरावती (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन असलेल्या एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. अजमत खान सत्तार खान (२९, नांदगाव खंडेश्वर) असे मयत तरुणाचे नाव आहे.
अजमत खान सत्तार खान या तरुणाने कोविड केअर सेंटरमधील खिडकीच्या ग्रीलला दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अमरावती येथे त्या युवकाचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून, कोविड केअर सेंटरजवळ बराच जनसमुदाय गोळा झाला होता. क्वारंटाइन असताना अजमतने आत्महत्या कशी केली? या प्रकरणाला जबाबदार कोण? आदी सवाल उपस्थितांनी केल्याने काही काळ वातावरण तापले होते. परंतू या संतप्त जमावाच्या प्रतिनिधीने या इमारतीत सीसीटीव्हीचे फुटेज बघितल्यावर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.