जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील उमेदवारांची ऑनलाईन नांव नोंदणी 2013 पासून कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या संकेतस्थळावर सुरु झालेली आहे. उमेदवार विभागाच्या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन नांव नोंदणी करीत आहेत. उमेदवारांनी ऑनलाईन नांव नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना मिळालेल्या युझर आयडी व पासवर्डच्या अनुषंगाने विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सुविधांचा आणि माहितीचा उमेदवारांना लाभ घेता येतो.
तथापि, विभागाच्या असे निदर्शनास आले आहेकी, अद्यापही ऑनलाईन नांव नोंदणी केलेल्या ब-याचशा उमेदवारांनी त्यांचे आधार व प्रोफाईल अद्यावत केलेले नाही. तसेच त्यांचा आधार क्रमांक प्रोफाईल मध्ये नमूद केलेला नाही आणि आधार क्रमांकाला जोडलेला (लिंक केलेला) मोबाईल क्रमांक नमूद केलेला नाही. त्यामुळे अशा उमेदवारांना विभागाच्या संकेतस्थळाचा उपयोग करतांना अडचणी निर्माण होतात.
तरी अशा उमेदवारांनी आधार व प्रोफाईल विभागाच्या www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर तात्काळ अपडेट न केल्यास त्यांची नोंदणी 30 सप्टेंबर, 2020 अखेर रद्द होईल. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 9.45 ते संध्या.6.15 या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0257-2239605 वर संपर्क साधावा, असे अनिसा तडवी, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.