जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोविड रूग्णालयातील वृध्देच्या मृत्यू प्रकरणी अखेर जिल्हा पेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून यात वॉर्ड क्रमांक ७ चे डॉक्टर, परिचारीका आणि सफाई कर्मचार्यांचा समावेश आहे.
याबाबत वृत्त असे की, मालती चुडामण नेहेते ( वय ८२) ही महिला जिल्हा कोविड रूग्णालयातून कथितरित्या बेपत्ता झाल्यामुळे पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या महिलेचा मृतदेह बुधवारी सकाळी शौचालयात आढळून आल्याने खळबळ उडाली होती. कोविड रूग्णालयातील अधिकारी व कर्मचार्यांच्या दुर्लक्षामुळे या महिलेचा बळी गेल्याची भावना व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणी पोलीस कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. या अनुषंगाने रात्री उशीरा जिल्हापेठ पोलीस स्थानकात वॉर्ड क्रमांक ७ मधील स्टॉफविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील कळसकर यांनी या प्रकरणी फियाद दिली असून संबंधीत वॉर्डचे डॉक्टर, परिचारीका आणि सफाई कर्मचार्यांच्या विरूध्द कलम ३०४-अ (सदोष मनुष्यवध) याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.