भडगाव प्रतिनिधी। तालुक्यातील कोळगाव येथील गोपीचंद पुना पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात ७१ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात हजारो विद्यार्थी व पंचक्रोशीतील शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. कार्यक्रमात ध्वजारोहण मुंबई येथे मंत्रालयातील अव्वल सचिव प्रशांत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ओंकार पाटील, युवराज पाटील, संभाजी पाटील, संजय पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर प्रा.प्रशांत पाटील यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करुन सर्वांना आपल्या सोबत वाचनास भाग पाडले, त्यानंतर पर्यावरणाचा समतोल मानवाकडून राखला जावा यासाठी उपस्थितांना योगेश बोरसे यांनी शपथ दिली. आजच्या ह्या कार्यक्रमात ध्वजगीत सादर करणाऱ्या तिरंगी गणवेशात असलेल्या विद्यार्थिनींनी तसेच बी.डी.साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली भगवा फेटा मस्तकी चढवलेल्या विद्यार्थिनींनी सादर केलेले लेझीम नृत्य तसेच व्ही.पी.सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्काऊटच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध रितीने केलेल्या पथसंचलनाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनीही देशभक्तीपर समुह गीत सादर करुन उपस्थितांची दाद मिळवली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस.ए.वाघ व आबासाहेब कोळगावकरांनी केले. कार्यक्रम यशस्वी होणेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस.पाटील, पर्यवेक्षक टी.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली न्यू इंग्लिश मेडियम स्कुल, माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय तसेच कला महाविद्यालयाच्या शिक्षक-शिक्षिका, प्राध्यापक-प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.