कोल्हापूर: वृत्तसंस्था । कोरोनाचं संकट असतानाच राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोल्हापुरात रक्तसाठ्यात केवळ १६०० रक्त पिशव्याच शिल्लक आहेत. लस घेतल्यानंतर दात्यांना दोन महिने रक्तदान करता येत नसल्याने त्याचा थेट परिणाम कोल्हापूरच्या रक्तसाठ्यावर झाला आहे.
या अनोख्या संकटामुळे कोल्हापूरच्या आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. केवळ आठ दिवस पुरेल इतका रक्त साठा शिल्लक आहे. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयासह जिल्ह्यातील सामाजिक संस्थांमध्ये केवळ १६०० रक्त पिशव्या शिल्लक आहेत. कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास जिल्हा अग्रेसर आहे. दिवसभरात जवळपास १५ हजार जणांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाते. लसीकरणानंतर संबंधित नागरिकाला दोन महिने रक्तदान करता येत नाही. त्यामुळे त्याचा थेट परिणाम रक्तसाठ्यावर झाला आहे. संभाव्य गरज लक्षात घेऊन रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
अमरावतीत ग्रामीण भागातील उपजिल्हा रुग्णालय व महत्त्वाच्या ग्रामीण रुग्णालयात रक्ताचा पुरवठा करणाऱ्या अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढीत केवळ दोन दिवस पुरेल एवढाच साठा आहे. अमरावती जिल्हा ग्रामीण रुग्णालयातून जिल्हा स्त्री रुग्णालय, सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल व जिल्हा ग्रामीण रुग्णालयाला रक्त पुरवल्या जाते. आता मात्र अचानक रक्तसाठा कमी झाल्याने आगामी काही दिवसात रक्तासाठी धावपळ होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल व जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी केले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुण्यातही रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या वर्षापासूनच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. सार्वजनिक रक्तदान शिबिरांमध्ये घट झाल्याने रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.