कोल्हापूर वृत्तसंस्था । येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये आज सकाळी लागलेल्या आगीत दोन सुरक्षा रक्षक जखमी झाले आहेत. ही आग शार्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
सीपीआरमधील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये करोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू होते. आग लागताच सर्व रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. मात्र, या सगळ्या धावपळीत दोन सुरक्षारक्षक जखमी झाले आहेत. आगीमुळं रुग्णालयात मोठी खळबळ उडाली होती. रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी तातडीने तेथे धाव घेऊन पाहणी केली. ट्रॉमा केअर सेंटरमध्ये १५ रुग्ण उपचार घेत होते. मात्र, त्यांना वेळीच सुरक्षित ठिकाणी हलवल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी दिली.