जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आज सत्तासंघर्षाच्या लागलेल्या निकालानंतर जळगाव जिल्ह्यातील शिंदे गटाच्या दोन आमदारांना दिलासा मिळाला आहे.
आज सुप्रीम कोर्टात शिंदे विरूध्द ठाकरे गटातील संघर्षाचा निर्णायक निकाल लागला. यात सर्वांचे लक्ष लागून होते ते सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाकडे ! कोर्टाने जर या १६ जणांना अपात्र ठरवले असते तर मग राज्यातील सरकार कोसळले असते. यामुळे या प्रकरणी नेमके काय होणार याकडे सर्व लक्ष ठेवून होते. यात सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे अपात्रतेचा निर्णय हा विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर हे घेणार असल्याचे सांगितले. यामुळे अर्थातच शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
कोर्टाच्या या निर्णयाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या अन्य १५ सहकारी आमदारांना दिलासा मिळणार आहे. यात जळगाव जिल्ह्यातील पारोळा-एरंडोल मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील आणि चोपडा मतदारसंघाच्या आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांचा देखील समावेश आहे. यामुळे कोर्टाच्या निकालाने या दोन्ही आमदारांना दिलासा मिळाला असून त्यांची आमदारकी शाबूत राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील लताताईंच्या कन्येचा विवाह कालच पार पडला असून या शुभ कार्याच्या पाठोपाठ आज त्यांना शुभ वार्ता मिळाल्याचेही दिसून आले आहे.